झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोव्हा बनली ७१वी मिस वर्ल्ड
लेबनॉनची यास्मिना झायटौन ठरली उपविजेता ~
मुंबई, १० मार्च २०२४: झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना पिस्जकोव्हाने ७१वी मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. मागील वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टीना हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. या सौंदर्य स्पर्धेत लेबनॉनची यास्मिना झायटौन ही उपविजेती ठरली आहे. सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधित्व करताना शीर्ष ८ मध्ये स्थान मिळवले. मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. मिस वर्ल्ड स्पर्धा तब्बल २८ वर्षानंतर भारतात आयोजित करण्यात आली.
मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेसाठी १२ जजचं पॅनल होतं. यामध्ये मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मॉर्ले, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी, तीन माजी मिस वर्ल्ड यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचं परीक्षण केलं.
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि २०१३ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मेगन यंगने यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. नेहा कक्कर, तिचा भाऊ टोनी कक्कर आणि शान यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी परफॉर्म केलं. या कार्यक्रमामुळे स्पर्धेला चार चांद लागले.