दूरसंचार उद्योगामध्ये मनुष्यबळ वाढीचा दर मंदावला: टीमलीज
मुंबई, ३० मे २०२४: सुरुवातीच्या स्तरावरील ग्राहकांशी संवाद साधणारे (विक्री, सहाय्य व सेवा) व तंत्रज्ञानाशी संबंधित नियुक्त्यांची मागणी वाढूनही भारतातील दूरसंचार उद्योगामध्ये एकंदर मनुष्यबळ वाढीचा दर मंदावला आहे, असे टीमलीज सर्व्हिसेसच्या ताज्या आकडेवारीतून दिसून येते.
उद्योगक्षेत्रातील सहयोगी मनुष्यबळात आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये ५१.०५ टक्के एवढी उत्तम वाढ झाली होती, तर ही वाढ आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये कमी होऊन ३१.४१ टक्क्यांवर आली. अर्थात या कालखंडात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह्ज, रिटेल इक्झिक्युटिव्ह्ज, इन्स्टॉलेशन इंजिनीअर्स, फायबर रिपेअर एक्झिक्युटिव्ह्ज आणि सेल साइट रिपेअर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या दूरसंचार कंपन्या सातत्याने करत होत्या.
टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाचे सीईओ कार्तिक नारायण म्हणाले "दूरसंचार क्षेत्रातील मनुष्यबळाचा कल दोन भागांत विभागलेला आहे, असे आमच्या आकडेवारीतून दिसते. कर्मचाऱ्यांच्या एकंदर वाढीचा दर कमी होत असला तरी ग्राहकांशी थेट संवाद साधणाऱ्या तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी तरुण प्रतिभावंतांना असलेली मागणी वाढत आहे. या नोकऱ्या उद्योगातील क्षेत्रीय कामकाजाला व पायाभूत सुविधांच्या जाळ्याला आधार देतात."
दूरसंचार क्षेत्रातील मनुष्यबळात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. या क्षेत्रातील मनुष्यबळापैकी ५६.८ टक्के १८ ते २९ वयोगटातील आहेत. डिलिव्हरी आणि तंत्रज्ञान तैनात करणे ही या उद्योगक्षेत्राची प्राथमिक आवश्यकता आहे आणि कर्मचारी समूहामधील तरुणांचे अधिक प्रमाण या आवश्यकतेला पूरक आहे.
दखलपात्र बाब म्हणजे या क्षेत्रामधील घसरणीचा दर आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ५८.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता, तो आर्थिक वर्ष २३-२४मध्ये ४३.४ टक्क्यांवर आला आहे. मनुष्यबळाच्या आकारमानाची वाढ संथ होणे हे यामागील एक कारण असू शकते. सरासरी वेतन रु. २४, ६००- रु. २५,४७५ या दरम्यान टिकवून ठेवले गेल्यामुळेही कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण कमी करण्यात मदत झाली असावी.
टीमलीज सर्व्हिसेसचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर सुब्बुरतीनम पी यांनी सांगितले की, ""एकंदर वाढीची संथ गती दखल घेण्याजोगी असली तरी कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण कमी करता येणे तसेच सुरुवातीच्या स्तरावर नियुक्त्यांचे प्रमाण कायम राखता येणे प्रोत्साहक आहे. नोकरीसाठी इच्छुक तरुण उमेदवारांमध्ये दूरसंचार क्षेत्राचे जोरदार आकर्षण आहे हे आमच्या आकडेवारीतून अधोरेखित होते. त्याचप्रमाणे स्पर्धात्मक मोबदला देऊन डिजिटल ज्ञान असलेल्या प्रतिभेला आकर्षित करून घेण्यासाठी उद्योगक्षेत्राने केलेले प्रयत्नही यातून दिसून येतात."
भारतातील दूरसंचार क्षेत्रातील मनुष्यबळाच्या उत्क्रांत होत असलेल्या आयामांचे सर्वसमावेशक चित्र टीमलीजच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मध्यम वाढीसह स्थित्यंतरात्मक टप्प्यातून झालेला क्षेत्राचा प्रवास यातून दिसून येतो. त्याचप्रमाणे ग्राहकांशी थेट साधणाऱ्या कामांची व तंत्रज्ञानकुशल व्यावसायिकांची वाढही मागणीही यातून स्पष्ट होते.
प्रमुख आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की सहयोगी वाढ आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये ५१.०५% होती जी आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ४४.७९% होती आणि आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ३१.४१% झाली. नोकरी सोडण्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये ५०.८% होते जे आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ५८.४% झाले आणि आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ५८.४% वर आले. सरासरी वेतन (रुपयांमध्ये) आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये २४,६०९ होते जे आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये २४,६३० झाले आणि आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये २४,४७५ वर आले.