क्विक हीलचे डॉ. कैलाश काटकर आयकॉनिक पुणेकर पुरस्काराने सन्मानित
July 28, 2024
0
क्विक हीलचे डॉ. कैलाश काटकर आयकॉनिक पुणेकर पुरस्काराने सन्मानित
मुंबई: क्विक हीलचे संस्थापक आणि दूरदर्शी नेतृत्व डॉ. कैलाश काटकर यांना ‘आयकॉनिक पुणेकर – पायोनीअर्स इन द फिल्ड ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचा प्रमुख भाग असलेल्या सदर्न कमांडच्या सहयोगाने आयोजित केल्या गेलेल्या या सोहळ्यामध्ये पुण्यातील शूरवीरांचे यश साजरे करण्यात आले, ज्यात समाजातील आणि सशस्त्र बलांमधील ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा समावेश होता.
डॉ. काटकर यांनी सायबरसुरक्षेच्या क्षेत्रामध्ये केलेल्या क्रांतिकारी कामाची दखल घेत त्यांच्या चिकाटी, दूरदृष्टी आणि भारताला एक सायबर-सुरक्षित देश बनविण्याप्रती त्यांच्या दृढ बांधिलकीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जीओसी-इन-सी सदर्न आर्मी कमांडर लेफ्ट. जन. अजय कुमार सिंग, पीव्हीएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी सशस्त्र बलांचे प्रतिष्ठित सदस्य, उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि प्रसिद्ध मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला.
क्विक हील टेक्नोलॉजिज लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर म्हणाले “आपल्या देशाचे संरक्षक असलेल्या सदर्न कमांडद्वारे केल्या गेलेल्या या गौरवाने मी अत्यंत सन्मानित झालो आहे. देशाला सुरक्षित ठेवण्याप्रती आपली सामायिक बांधिलकी हा एक अत्यंत शक्तिशाली असा बंध आहे. हा पुरस्कार म्हणजे क्विक हिलमधील माझ्या टीमची मेहनत आणि समर्पितता यांचे प्रतीक आहे. तीन वर्षांहून अधिक काळासाठी आम्ही ‘सायबरसुरक्षा हा सर्वांसाठीचा मुलभूत हक्क’ बनविण्याच्या ध्येयाचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत व त्यायोगे भारताच्या डिजिटल इंडियाच्या ध्येयाला पाठबळ पुरवित आहोत. एक जबाबदार नेतृत्व म्हणून शाश्वतता हा आमच्या मुलभूत तत्वांचा अविभाज्य भाग आहे आणि युवा विकासावर तसेच सायबरसुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आमच्या सीएसआर उपक्रमांमुळे ५० लाख आयुष्यांना स्पर्श केला आहे. अवघे विश्व जिचे साक्षीदार बनेल अशी मेक इन इंडियाची यशोगाथा आणखी पुढे नेण्याप्रती आमच्या बांधिलकीला या गौरवामुळे चालना मिळाली आहे व हा पुरस्कार म्हणजे भविष्यात जागतिक स्तरावर यशाचे आणखी टप्पे गाठण्याची प्रेरणा आहे.”
क्विक हील टेक्नोलॉजीज लि. आणि तिची उद्योजकीय सायबरसुरक्षा शाखा सेकराइटने ग्राहक आणि एसएमबी बाजारपेठेतील प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली क्विक हीलने आर्थिक कामगिरी, ग्राहक समाधान, बाजारपेठेतील हिस्सा आणि उत्पादकता अशा सर्व आघाड्यांवरील कामगिरीच्या माध्यमातून लक्षणीय व्यावसायिक मूल्य सातत्याने निर्मिले आहे. या मेक-इन-इंडिया यशोगाथेला घडविण्याप्रती त्यांच्या समर्पिततेमुळे पेटंटप्राप्त तंत्रज्ञाने, कित्येक जागतिक प्रमाणने आणि सहयोगांच्या माध्यमातून भारताच्या सायबरसुरक्षा परिसंस्थेची प्रगल्भता दिसून आली आहे. कंपनीकडे भारतातील सर्वात मोठी मालवेअर विश्लेषण प्रयोगशाळा आहे, जिथे सुमारे ९० लाख एंडपॉइंट्सकडून डीप थ्रेट इंटेलिजन्स पुरविले जाते.