गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून चार मराठी चित्रपटांची निवड;
October 11, 2024
0
विशेष बातमी ---- दिलीप रामचंद्र यादव
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून चार मराठी चित्रपटांची निवड;
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड, छबिला चित्रपटाची निवड
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड, छबिला या चार मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या चारही चित्रपटांच्या चमूचे श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे उपस्थित होत्या.
मराठी चित्रपटाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने २०१५ पासून सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट पाठवले जातात.
या चित्रपटांची निवड करण्याकरिता मृण्मयी देशपांडे, निपुण धर्माधिकरी, महेश लिमये, अमितराज सावंत, मीना कर्णिक या पाच परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड, छबिला या चार मराठी चित्रपटांची निवड केली आहे. या चारही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे.
पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा महोत्सव संपन्न होणार असून येथे शासनाचा आकर्षक स्टॉल उभारण्यात येणार आहे. तसेच चारही चित्रपटांचे स्क्रिनींगदेखील करण्यात येणार आहे.
......................…........