सुप्रिया लाइफसायन्सेसच्या रक्तदान मोहिमेला भरघोस प्रतिसाद – 1790 रक्तदात्यांमुळे वाचणार अनेक जीव
मुंबई, १० डिसेंबर 2024 – आरोग्यसेवा आणि सामाजिक जबाबदारीप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी सुप्रिया लाइफसायन्सेस लि. ने मुंबईतील सात आघाडीच्या रक्तपेढ्यांसह भागिदारीत महत्त्वाकांक्षी आणि भव्य रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून 1790 रक्तदाते त्यात सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी रक्ताचे 525 युनिट्स जमा झाले.
हा उपक्रम प्रबोधन ब्लडबँक, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्ट आणि जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. प्रबोधन ब्लडबँक येथे सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात समाजाच्या विविध स्तरांतील स्वयंसेवक आणि रक्तदाते सहभागी झाले होते. समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याच्या समान हेतूने हे सर्व एकत्र आले होते.
याप्रसंगी सुप्रिया लाइफसायन्सेस लि. चे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक डॉ. सतीश वाघ म्हणाले, ‘ही रक्तदान मोहीम समाज आणि समान हेतूच्या ताकदीचे प्रतीक आहे. आयुष्य वाचवण्यासाठीचा प्रत्येक प्रयत्न, मग तो कितीही लहान असला, तरी महत्त्वाचा आणि आपल्या आरोग्य यंत्रणेला मजबूत करणारा असतो, असे सुप्रिया लाइफसायन्सेसमध्ये आम्हाला वाटते. आज या मोहिमेत सहभागी झालेल्यांच्या दातृत्वाने मी भारावून गेलो आहे. त्यांचे योगदान नक्कीच महत्त्वाचा फरक घडवून आणेल.’
या उपक्रमाच्या यशातून सुप्रिया लाइफसायन्स लि. चे महत्त्वाच्या आरोग्यसेवा आणि त्यांच्याशी संबंधित गरजा पूर्ण करण्याची तसेच समाजाचे ऋण परत देण्याची संस्कृती जपण्याची बांधिलकी दिसून आली आहे.
सुप्रिया लाइफसायन्स लि. सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि भागीदार रक्त पेढ्यांची आभारी आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वी झाली. जमा करण्यात आलेले रक्त गरजू रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील दरी सांधली जाईल.