गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलच्या अनया शहाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर गाथा ४.० पुरस्कार
गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी अनया शहा हीने उल्लेखनीय कामगिरी करत, संरक्षण मंत्रालयाच्या वीर गाथा ४.० उपक्रमातील १०० विजेत्यांपैकी एक विजेता बनण्याचा बहुमान मिळवला आहे. हा उपक्रम भारतीय वीरांच्या शौर्याचा सन्मान करणारा आहे आणि अनायाच्या उत्कृष्ट चित्रकलेच्या कौशल्याने तिला हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्यास मदत केली.
अनया महाराष्ट्रातील २० विजेत्यांपैकी एक असून, आपल्या वयोगटातील देशभरातील २५ विजेत्यांमध्ये स्थान मिळवणारी आणि संपूर्ण भारतातील टॉप १०० स्पर्धकांपैकी एक आहे. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात माननीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, तिने कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग घेतला.
आपला आनंद व्यक्त करताना अनया म्हणाली, "हा पुरस्कार मिळवणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सर्जनशीलतेचा उपयोग करणे हे खरोखरच अद्भुत आहे. माझ्या शाळेने मला केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर स्वतःला व्यक्त करण्याची आणि माझा खरा उत्साह शोधण्याची संधी दिली आहे. माझ्या शिक्षकांनी मला नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि माझ्या प्रतिभेला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे."
गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलच्या प्राचार्या श्रीमती मधु वाडके यांनी अनायाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले, "आमच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. अनयाने मिळवलेले यश हे योग्य संधी, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या संयोगाचे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे आणि ती भविष्यातही असेच यश संपादन करावी हीच आमची इच्छा."
१९५३ मध्ये श्रीमती गोपी बिर्ला यांनी स्थापन केलेले गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल हे बिर्ला इंडस्ट्रीज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट (BIGCT) चा एक भाग आहे आणि यश बिर्ला ग्रुप समुदायातील एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची असलेली कटिबद्धता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे संस्थेने एक उच्च स्थान निर्माण केले आहे. २०१४ मध्ये, CBSE तर्फे शाळेला इयत्ता १२वी पर्यंत कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली, ज्यामुळे ती देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून अधिक दृढ झाली आहे.